शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अहिल्यानगरच्या अथर्व हरबा ला जिल्हास्तरीय शारदा टेबल टेनिस स्पर्धेत किताब…

---Advertisement---

कोपरगाव : सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय १५ वर्षाखालील टेबल टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण १२ शाळांमधील ३४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांसोबतच मुलींनीही खुल्या गटात सहभाग घेत मुलांविरुद्ध तगडी लढत दिली. जिल्ह्यातील तब्बल ९ मुलींनी या स्पर्धेत उतरून आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यांच्या खेळामुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढली आणि क्रीडा क्षेत्रातील समानतेचा सकारात्मक संदेश दिला गेला.
स्पर्धेचे उद्घाटन सिद्धेश कपिले, किरण पवार, सुनील आहेर, रामदास खरात, नमिष,पर्यवेक्षिका पल्लवी ससाणे, नाथलीन फर्नांडिस,क्रीडा विभाग प्रमुख धनंजय देवकर तसेच शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडले.संपूर्ण स्पर्धेत एकूण ३५ सामने खेळवण्यात आले.उपांत्य फेरीत अथर्व हरबाने अनुवेद गाडेकरचा ३-० असा सरळ पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अब्दुल तांबटकरने रितेश दहिवलकरचा ३-० ने पराभव करून अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात अथर्व हरबाने अब्दुल तांबटकरवर ११-०९, ११-०८, ११-०९ अशा सरळ सेट्समध्ये मात करत विजेतेपद पटकावले. अथर्वच्या अचूक सर्व्हिस आणि आक्रमक खेळामुळे अंतिम सामना अत्यंत रंगतदार झाला.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विजेता अथर्व हरबा याला ₹२१०० व चषक, उपविजेता अब्दुल तांबटकर याला ₹११०० व चषक, तृतीय क्रमांक अनुवेद गाडेकर याला ₹५०० तर चतुर्थ क्रमांक रितेश दहिवलकर याला ₹३०० रोख पारितोषिक देण्यात आले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल आल्हाट, गणेश वाघ,गणेश मोरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.पंच म्हणून साहिश वाघ, अर्णव गगे, जिशान इनामदार, जयदीप दरंगे यांनी काम पाहिले.

“जिल्ह्यातील नऊ मुलींनी मुलांविरुद्ध उतरून दिलेली झुंज ही केवळ स्पर्धेची आकर्षक बाब नव्हती, तर क्रीडा क्षेत्रात मुलींच्या वाढत्या आत्मविश्वासाचे आणि समानतेच्या दिशेने टाकलेल्या भक्कम पावलाचे प्रतीक आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment