- कीर्तनांची मोठी रेलचेल
नेवासा : नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कुटे वस्ती येथे ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने व गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, ह भ प सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य पसरले असून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.
सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे काकडा,भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन आणि सायंकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज साय. 7 ते 9 या वेळेत महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा होत आहे.
या सप्ताहामध्ये दररोज वेगवेगळ्या विषयांवर आधारित कीर्तने होत आहेत.
प्रथम पुष्प ह.भ.प. सुखदेव महाराज मुंगसे यांनी आपल्या रसाळ वाणीतून ‘भक्ती’ या विषयावर निरूपण केले.द्वितिय पुष्प ह.भ.प. कृष्णा महाराज पुंड यांनी संतांच्या अभंगांतून समाजप्रबोधन केले.तिसरे पुष्प ह भ प तुकाराम महाराज केसभट यांनी संतांनी दिलेला आध्यात्मिक वारसा सांगितला. तर चौथे पुष्प ह भ प कविताताई महाराज कदम यांनी संतांच्या संगतीचा फायदा आपल्या वाणीतून श्रोत्यांना ऐकवीला.येणाऱ्या दिवसांत महाराष्ट्रातील नामांकित दिग्गज महाराजांची कीर्तने होणार असल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
दररोज महाप्रसादाचे आयोजन केले असून सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन भागवताचार्य ह भ प योगेश महाराज खेडके यांचे होईल होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी मंदिर परिसराची आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवशक्ती मित्र मंडळ ग्रामस्थ आणि हनुमान सप्ताह कमिटीचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.







