२५८ लाभार्थ्यांना लाभ; ६२ जणांची आरोग्य तपासणी
श्रीरामपूर : तालुक्यातील भोकर येथील श्री. चक्रपाणी महानुभव आश्रम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत २५८ लाभार्थ्यांना थेट सेवा देण्यात आली.तर ६२ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरास महानुभाव पंथाचे विकासपुरुष कवीश्र्वर कुळाचार्य श्रीकारंजेकर बाबाजी, अपर जिल्हाधिकारी शिर्डी बाळासाहेब कोळेकर, अपर जिल्हाधिकारी नगर शैलेश हिंगे तसेच गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात उत्पन्न व भूमिहीन दाखले, संजय गांधी योजना लाभ, आधार अद्ययावत, रेशनकार्ड, आयुष्यमान कार्ड तसेच जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत विविध सेवा देण्यात आल्या. याशिवाय ६२ नागरिकांची आरोग्य तपासणी करून बी.पी., शुगर व हिमोग्लोबिन चाचण्या करण्यात आल्या तसेच आवश्यक औषधोपचारही देण्यात आले.
प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संगायो नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, पुरवठा निरीक्षक राजेंद्र शिंदे, प्र. निवासी नायब तहसीलदार अभया राजवाळ यांच्यासह महसूल व संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत शिबीर यशस्वी केले.







