शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

एकल महिलांविषयी असंवेदनशीलता

---Advertisement---

मिशन वात्सल्य समिती बैठकीस अधिकाऱ्यांची दांडी


श्रीरामपूर – महाराष्ट्र सरकार एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण ठरविण्याची तयारी करीत असतानाच, दुसरीकडे अधिकाऱ्यांमधील एकल महिलांविषयीची असंवेदनशीलता समोर येत आहे.
तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली राज्यात तालुका पातळीवर मिशन वात्सल्य शासकीय समिती गठीत करण्यात आलेल्या आहेत. श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य शासकीय समितीची बैठक नुकतीच झाली. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस गेल्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे नायब तहसीलदार डी.पी. शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर तालुका शासकीय समितीची बैठक झाली. प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी तथा समितीच्या सदस्य सचिव शोभा शिंदे, अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव, नगरपालिकेच्या प्रतिनिधी वर्षा पाठक यांची बैठकीस उपस्थिती होती. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका विधी सेवा प्राधिकरण, पंचायत समितीचे समाजकल्याण विभागाचे विस्ताराधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवनोन्नती (उमेद ) अभियानचे प्रतिनिधी, यांनी बैठकीस दांडी मारली. शोभा शिंदे यांनी बैठकीच्या सुरूवातीस मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. मागील सभेस देखील मोजकेच अधिकारी उपस्थित होते. सलग दोन बैठकांना अधिकारी गैरहजर दिसल्याने मिलिंदकुमार साळवे व बाळासाहेब जपे यांनी अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजेरीबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून त्यांना अनुपस्थितीचा जाब विचारला पाहिजे, असे सांगितले. त्यावर सभेचे अध्यक्ष नायब तहसीलदार शेकटकर यांनी तहसीलदारांना विचारून याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
नगरपालिका हद्दीत एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत ६८४ एकल महिलांची नोंद झाल्याचे वर्षा पाठक यांनी सांगितले. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने अपात्र शिधापत्रिकाधारक शोधमोहीम हाती घेतली आहे. यात अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांना वगळून नव्याने इष्टांक तयार होणार आहे. त्यात एकल महिलांचा प्राधान्याने विचार करून त्यांना लाभ देण्यात येईल, असे नायब तहसीलदार शेकटकर यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment