शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

स्वच्छता आणि पर्यावरणासाठी मोठे पाऊल; लोणी खुर्दमध्ये अत्याधुनिक प्रकल्पांची सुरुवात

---Advertisement---

लोणी : राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील चिकन-मटण मार्केट परिसरात स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. सुमारे ५० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली अत्याधुनिक पशुदाहिनी तसेच ९३ लाख रुपये खर्चाचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प अशा एकूण १ कोटी ४३ लाख रुपयांच्या या दोन प्रकल्पांमुळे परिसरातील स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असल्याचे मत डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केले.
हा प्रकल्प जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असून स्वच्छता व पर्यावरण व्यवस्थापनाच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, संचालक राहुल धावणे पाटील, संचालक दत्तात्रय गोरे पाटील, संचालक दिलीपराव गाडेकर, सचिव एस. मोटे तसेच व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, चिकन व मटण मार्केटमधील अवशेषांची शास्त्रोक्त व सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेली ही पशुदाहिनी जिल्ह्यातील अशा प्रकारची पहिलीच अत्याधुनिक सुविधा आहे. या दाहिनीत टाकण्यात येणारे अवशेष पूर्णपणे जळून त्याची राख तयार होते. विशेष म्हणजे, या राखेचा पुढील काळात सेंद्रिय खत म्हणून उपयोग केला जाणार असून पर्यावरणपूरक व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण होणार आहे.
या प्रकल्पामुळे सांडपाण्याचे योग्य प्रकारे शुद्धीकरण होऊन परिसरातील स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागणार असून स्थानिक नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
कार्यक्रमादरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. विखे पाटील यांनी व्यापारी व ग्रामस्थांशी संवाद साधत स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व आधुनिक सुविधा उभारणीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकल्पांमुळे बाजारपेठ परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी राहण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोणी परिसरात राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment