- अदिरा बुतकरच्या सामाजिक छोट्याशा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
लोणी:समाजामध्ये वावरताना केवळ स्वतःचा विचार न करता आपल्याकडून समाजासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे, हा उदात्त विचार उराशी बाळगून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगाव येथील विद्यार्थिनी कु. अदिरा विनायक बुतकर हिने आपला आठवा वाढदिवस अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि स्तुत्य उपक्रमाने साजरा केला आहे. ९ एप्रिल रोजी असलेल्या आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून अदिराने शाळेतील ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तके भेट दिली आहेत.
राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांच्या ‘शिक्षण आणि स्वच्छता’ या विचारांनी प्रेरित होऊन अदिराने आपल्या वाढदिवसाला अवाजवी खर्च न करता शाळेतील वाचनालयासाठी पुस्तके देण्याचा आग्रह आपल्या वडिलांकडे धरला होता. आपल्या चिमुकलीचा हा संवेदनशील आणि प्रगल्भ विचार ऐकून तिचे वडील विनायक बुतकर यांनी तात्काळ या निर्णयाला पाठिंबा दिला आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या आवडीची व ज्ञानवर्धक अशी अनेक छान छान पुस्तके विकत घेऊन अदिराच्या हस्ते शाळेला सुपूर्द केली.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अदिराच्या या उपक्रमाचे शाळेतील शिक्षकांनी विशेष कौतुक केले. अदिरा ही केवळ अभ्यासातच नाही तर विचारांनी देखील खूप हुशार मुलगी आहे, अशा शब्दांत तिचे वर्गशिक्षक श्री. कर्डिले सर यांनी तिच्याबद्दल लहान वयात खूप मोठा विचार केल्याबद्दल तिचे कौतुकही केले आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेला दिलेली ही भेट केवळ पुस्तके नसून ती ज्ञानाची शिदोरी आहे, जी अनेक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्याध्यापक साने सर आणि सहाने सर यांनी व्यक्त केला.
वाढदिवसाच्या या छोट्याशा समारंभाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत अदिराला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. आजच्या काळात वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीने दाखवलेले हे सामाजिक भान समाजातील इतरांसाठी, विशेषतः विद्यार्थी वर्गासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरले आहे. या उपक्रमाबद्दल संपूर्ण परिसरात अदिरा आणि बुतकर कुटुंबाचे अभिनंदन केले जात आहे.







