अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध सुरू झाल्यानंतर अनेकदा इराणला धमक्या दिलेल्या आहेत. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येते. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांची मुदत दिली होती. ही मुदत काही तासांत संपुष्टात येत आहे. दिवसभरात ट्रम्प यांनी इराणला अनेक इशारे दिले. मात्र काही वेळापूर्वी त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला असून आज रात्री मोठा विनाश होणार असल्याचे सूतोवाच केले आहे. आजच्या रात्री इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळेपूर्वी ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी या धमकीचा इशारा दिला. ते म्हणाले, आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल. जी पुन्हा परत कधीही आणता येणार नाही. असे व्हावे, अशी माझी बिलकुल इच्छा नाही. पण कदाचित ते होईलच.
“तथापि, आता पूर्ण सत्तापालट होत आहे. जिथे, वेगळे, हुशार आणि कमी कट्टरतावादी विचारांच्या लोकांचे वर्चस्व असेल. ते कदाचित काहीतरी क्रांतिकारक अद्भुत असे घडवू शकतील, हे कुणालाही ठाऊक नाही. जगाच्या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील आजच्या सर्वात महत्त्वाच्या रात्रीच ते कळू शकेल. ४७ वर्षांची लूटमार, भ्रष्टाचार आणि मृत्यूचे तांडव अखेर संपुष्टात येईल”, असेही ट्रम्प पुढे म्हणाले आहेत.





