गटशिक्षणाधिकारी यांनी केले सारथ्य
श्रीरामपूर : शाळेचा पहिला दिवस म्हणजे रडारड, पालकांची ओढाताण आणि शिक्षकांची मनधरणी… हे समीकरण बेलापूर खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने यंदा खोडून काढत वाजत-गाजत प्रभात फेरी काढून एक आगळेवेगळे स्वागत केले. विशेष म्हणजे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सजवलेल्या वाहनाचे सारथ्य करत यंदाचा शाळाप्रवेश सोहळा ऐतिहासिक केला.काल बुधवारी नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी बेलापूर खुर्द येथे नवागतांच्या स्वागतासाठी विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे. त्यांनी स्वतः सजवलेले वाहन चालवत नवागत विद्यार्थ्यांना वाद्यवृंदाच्या गजरात प्रभात फेरीद्वारे शाळेत आणले. प्रशासकीय अधिकाऱ्याचा हा उत्साह पाहून गावकरी आणि पालक भारावून गेले होते.शाळेच्या पहिल्याच दिवशी सामाजिक बांधिलकी जपत कार्यकर्ते राजेंद्र कुंकूलोळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचे वाटप केले. शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवा उत्साह दिसून आला. कार्यक्रमास उपसरपंच ॲड. दीपक बारहाते, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आरती महाडिक, उपाध्यक्ष रवींद्र गाढे, राजेंद्र कुंकूलोळ, सदस्या नयना बडधे, प्रणाली भगत, बिलाल सय्यद, आरिफ सय्यद, दिलीप बडधे, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन उपाध्यापक श्रीकांत झिंजुर्डे यांनी केले. प्रास्ताविक करून आभार मुख्याध्यापिका प्रियंका शहाणे यांनी मानले.फोटो ओळीनवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी बेलापूर खुर्द जिल्हा परिषद शाळेत प्रवेशित झालेल्या नवागतांचे स्वागत करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांनी वाहनाचे सारथ्य केले.








