सुधा मूर्ती यांना डी. लिट.
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २७ वा पदवी प्रदान समारंभ २३ एप्रिल रोजी होणार आहे. आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. तसेच राज्यसभेच्या संसद सदस्या पद्मभूषण सौ. सुधा मूर्ती यांना डी. लिट. प्रदान करण्यात येणार आहे. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. अँथनी रोज उपस्थित राहणार आहेत. या पदवी प्रदान समारंभात ९०६६ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. १४० विद्यार्थ्यांना पीएच डी ही पदवी आणि २७ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी १०.०० वा. भारती विद्यापीठाच्या पुणे-सातारा रोड येथील शैक्षणिक संकुलात संपन्न होणार आहे. अशी माहिती भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी दिली.
डॉ. सावजी म्हणाले, भारती विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळीच या विद्यापीठाचे विश्वविद्यालयात रूपांतर करण्याचे स्वप्न डॉ. पतंगराव कदम यांनी पाहिले होते. ते १९९६ साली प्रत्यक्षात उतरले. भारती विद्यापीठाला भारत सरकारने अभिमत विश्वविद्यालयाचा दर्जा दिला. गेल्या ३० वर्षांत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने गुणवत्तेच्या बळावर देदीप्यमान कामगिरी करून नामांकित विश्वविद्यालय म्हणून लौकिक मिळवला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ए-ग्रेड युनिर्व्हसिटी म्हणून उमटवलेली मोहर, नॅकने मूल्यांकनात आणि पुनर्मूल्यांकनात दिलेला ए++ दर्जा, एनआयआरएफमध्ये महाविद्यालयांनी मिळविलेले मानांकन या गोष्टी विश्वविद्यालयाच्या नाव लौकिकात मानाचा तुरा खोवणार्या आहेत. भारती विद्यापीठाचे विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांचे बहरलेले कर्तृत्व हेच विद्यापीठाच्या कार्यक्षमतेचे आणि गुणवत्तेचे खरे प्रतिबिंब आहे.







