शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

ज्येष्ठांच्या सभागृहात युवा प्रतिनिधींचा सहभाग हा सक्षम लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत – सभापती प्रा. राम शिंदे

---Advertisement---
  • राष्ट्रकुल संसदीय मंडळ विभाग – 7 च्या पणजी वार्षिक परिषदेत विकसित भारत – 2047 चे उद्दीष्ट साध्य करतांना विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका आणि व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण, तटीय संपर्कयंत्रणा यासाठी क्षेत्रीय प्राधान्यक्रम या विषयांवर विचारमंथन

पणजी : महाराष्ट्र विधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह म्हणून ओळखले जात असले तरी अलीकडच्या काळात युवा प्रतिनिधींचा वाढता सहभाग आणि संख्याबळ सक्षम लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत असल्याचे मत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र – गोवा – गुजरात या विभाग – 7 च्या पणजी येथे आयोजित वार्षिक परिषदेच्या उद्घाटनसत्रात ते बोलत होते. लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 09 व 10 एप्रिल, 2026 रोजी ही परिषद पणजी येथे आयोजित करण्यात आली असून त्यास राज्यसभेचे उप सभापती श्री. हरिवंश सिंह, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, महाराष्ट्रासह राज्यविधानमंडळांचे सदस्य उपस्थित आहेत. गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या परिषद उद्घाटनसत्रात आपले महत्वपूर्ण विचार मांडले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ विभाग – 7 च्या या पणजी वार्षिक परिषदेत विकसित भारत – 2047 चे उद्दीष्ट साध्य करतांना विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका आणि व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण, तटीय संपर्कयंत्रणा यासाठी क्षेत्रीय प्राधान्यक्रम या दोन विषयांवर विचारमंथन होईल.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लखनऊ येथे झालेल्या पीठासीन अधिकारी परिषदेत या विभाग परिषद उपक्रमाची बीजे रोवली गेली आणि आज ती प्रत्यक्षात साकारली आहेत. ‘२०४७ पर्यंत विकसित भारत’ या पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ततेत युवा विधिमंडळ सदस्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन कालावधीत आयोजित केल्या जाणाऱ्या ‘संसदीय अभ्यासवर्ग’ उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते आणि या उपक्रमातून घडलेले विद्यार्थी आज विधिमंडळात प्रतिनिधित्व करत आहेत. विधिमंडळ कामकाजातील युवा सदस्यांच्या सहभागाचे महत्व स्पष्ट करतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे उल्लेखनीय योगदान सभापती प्रा. राम शिंदे यांनी अधोरेखीत केले.
परिषदेत ‘व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण आणि तटीय संपर्क’ या महत्त्वाच्या विषयांवरही सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्यांचा विस्तृत सागरी किनारा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, ‘ब्लू इकॉनॉमी’ मजबूत करताना मच्छीमार समुदायाचा विकास आणि पर्यावरण संवर्धन यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, ‘सर्क्युलर टुरिझम सर्किट’ सारख्या संयुक्त पर्यटन उपक्रमांमुळे राज्यांमध्ये आर्थिक सहकार्य वाढू शकते, असेही त्यांनी नमूद केले. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, अहमदाबाद आणि पणजी यांसारखी शहरे ‘स्मार्ट’ बरोबरच ‘संवेदनशील’ आणि ‘पर्यावरणपूरक’ बनविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
ही परिषद म्हणजे केवळ औपचारिक संवाद नसून एक सामूहिक संकल्प आहे. सन – २०४७ च्या ‘स्वर्णिम भारत’ निर्मितीत विभाग – 7 चा मोलाचा वाटा राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेमुळे तिन्ही राज्यांच्या विधिमंडळांमध्ये नव्या कल्पना, धोरणे आणि सहकार्याचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment