ओंकार संगीत निकेतन यांनी प्रथम तर ओम् नाटय संस्कार यांनी व्दितीय पारितोषिक पटकावले
अहिल्यानगर – येथील डॉ. कांकरिया यांचे मानकन्हैय्या ट्रस्ट आयोजित खास ज्येष्ठ नागरिकांसाठी दुसरे बालपण स्पर्धा 2026 मध्ये नगर येथील संगीत निकेतन यांचे ‘शुभमंगल’ यांनी प्रथम तर ओम नाटय संस्कार ‘तुला भेटतो रे’ या नाटिकेने व्दितीय पारितोषिक पटकावले. तृतीय पारितोषिक सप्तरंग थिएटर्स यांचे ‘एक आगळा वेगळा सोहळा’ यांना प्राप्त झाले. आणि उत्तेजनार्थ पारितोषिक विभागुन देण्यात आले त्यात छत्रपती संभाजीनगर येथील स्वयंसिध्द ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघ यांचा ‘लग्न सोहळा की गरज?’ आणि आमचे आम्ही या संस्थेचे सहव्वीस लग्नाची गोष्ट यांना मिळाला. खास दुसरेबालपण या स्पर्धेसाठी लिहिलेल्या जागतिक लग्नोत्सव या नाटिकेसाठी लेखनाचे पारितोषिक पुणे येथील लेखक श्री चंद्रशेखर जोशी यांना प्राप्त झाले. अशी माहिती संयोजिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.सदर प्रसंगी खास परिक्षकांच्या शिफारशीने 80 वर्षांच्या आशा देशपांडे व सौ. मिनाक्षी सरोदे यांचा उत्कृष्ट अभिनयासाठी विशेष सत्कार करण्यात आला. परीक्षक म्हणून सौ. स्नेहा रानडे, श्री अमोल खोले, श्री शैलेश देशमुख यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेचा शुभारंभ माननीय परीक्षकांच्या हस्ते नटराज पुजन, प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने झाला. 4 वर्षीय छोटी रियांशी राठी हिने 3 मिनीटात हनुमान चालिसा सादर करून विश्वविक्रम केला त्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. जागतिक किर्तीचे चित्रकार शिल्पकार श्री प्रमोद कांबळे यांच्या हस्ते 3 डी फोटो पॉईंटचे उद्घाटन झाले. दिवसभर शेकडो प्रेक्षकांनी या फोटो पॉईंटवर फोटो काढून हरवलेली संस्कार शाळा परत गवसण्याचा आनंद व्यक्त केला.पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिध्द साहित्यकार, नाटककार सदानंद भणगे यांच्या हस्ते संपन्न झाले. ते म्हणाले की खास ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा प्रकारची आगळी वेगळी स्पर्धा ही भारतातीलच काय पण जगातील प्रथम व एकमेव अशी आहे. ही स्पर्धा ज्येष्ठांच्या जीवनात सप्तरंगी रंग भरणारी आहे. जगण्याला एक आगळावेगळा अर्थ प्राप्त करून देणारी आहे. दुसरे बालपण म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे तर कला व आनंद यांचा सुरेख संगम आहे. यातुन दुसर्या बालपणाला बागडण्यासाठी एक नवीन रंगमंच प्राप्त होतो. कलागुणांचे जागरण होते. अशा स्पर्धेमध्ये भाग घेणे म्हणजे जीवनाला एक टॉनीक मिळणे होय. मी डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया आणि संयोजन समितीचे अभिनंदन करतो.सुरूवातीस कार्याध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया यांनी स्वागत केले. स्पर्धेमागचा उद्देश स्पष्ट केला. यंदाच्या वर्षी छत्रपती संभाजीनगर, तसेच येवला नाशिक, अहिल्यानगर सहित एकुण 12 संघांनी सहभाग नोंदवला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 2027 च्या दुसर्या बालपण स्पर्धेची थीम जाहिर केली, थीम- मला मिळालेले पहिले पत्र. या थीमला अनुसरून नाटिका, नृत्यनाटिका, संगीत नाटिका सादर करण्याचे आवाहन केले. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी मातोश्री स्वातंत्र्य सैनिका मानकुंवरबाई कांकरिया, पिताश्री कन्हैय्यालालजी कांकरिया यांच्या स्मरणार्थ मानकन्हैय्या ट्रस्टची स्थापना झाली असे सांगुन या ट्रस्टच्या माध्यमातुन राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धा कांकरिया करंडक तसेच दुसरे बालपण स्पर्धेचे आयोजन होते हे नमुद केले. यंदाच्या वर्षी खास प्रेक्षकांनाही स्पर्धेच्या निकालाचा अंदाज लावण्यासाठी संधी देण्यात आली होती त्यात 3 प्रेक्षकांनी बरोबर अंदाज व्यक्त करून सन्मानपत्र पटकावले. “चाय पे चर्चा” हि उस्फुर्त नाटिका सादर करून चंद्रशेखर जोशी आणि सौ अजया जोशी परीक्षकांची वाह वा मिळविलीसदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पी डी कुलकर्णी, चंद्रकांत पालवे, सदाशिव मोहिते, नंदकुमार देशपांडे, प्रशांत कटके, जयंत येलूलकर, प्रसाद बेडेकर, चंद्रकांत पंडित, हेमंत लोहगांवकर, प्रिया सोनटक्के, रामदास केदार, दिपक शिरसुल हे परिश्रम घेतले. सदर स्पर्धेसाठी 92.7 बिग एफएम आणि 106.4 एफएम रेडिओ ऑरेंज यांनी रेडिओ पार्टनर म्हणून आपली भूमिका चोख बजावली. सूत्रसंचलन आदिनाथ अन्नदाते, डॉ. प्राजक्ता सावेडकर यांनी केले, शेवटी प्रशांत कटके यांनी आभार मानले.







