लोणी : मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावून आयएएस (IAS), आयपीएस (IPS), डॉक्टर, इंजिनिअर अशी मोठी ध्येये बाळगावीत आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ‘आर्टी’ (ARTI) संस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनिलजी वारे (IRAS) यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथील सुरभी मंगल कार्यालयात रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (ARTI), मुंबई यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी लाभलेले श्री. सुनिलजी वारे बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘आर्टी’च्या निबंधक मा. श्रीमती इंदिरा अस्वार मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. भाऊसाहेब पवार यांनी ही कार्यशाळा घेण्यामागील मूळ प्रेरणा स्पष्ट केली. नव्याने निर्माण झालेल्या ‘आर्टी’ संस्थेची माहिती महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. सुनिलजी वारे यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन करत, ही स्वप्ने साकार करण्यासाठी संस्था सदैव पाठीशी उभी राहील असा विश्वास दिला.
प्रमुख मार्गदर्शिका श्रीमती इंदिरा अस्वार मॅडम यांनी मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘आर्टी’च्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सर्व आर्थिक व शैक्षणिक योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण, त्यासाठी दिली जाणारी आर्थिक मदत आणि इतर व्यावसायिक प्रशिक्षणांबद्दल सखोल मार्गदर्शन करून उपस्थित विद्यार्थी व पालकांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ‘डेअसरा’ या संस्थेच्या वतीने श्रीमती मनस्वी तपासे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. केवळ नोकरी मागणारे न बनता, स्वतः नोकरी देणारे सक्षम उद्योजक बना, असा कानमंत्र त्यांनी दिला. त्याचप्रमाणे संतोष वाबळे आणि हरिदास मानते यांच्या संस्थेच्या वतीने देखील मातंग समाजातील मुला-मुलींना विविध कौशल्य विकास योजनांची माहिती देऊन त्यांची नोंदणी मोहीम राबवण्यात आली.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मातंग समाज संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड. विक्रम गायकवाड यांनी आर टीआणि अहिल्यानगर जिल्हा (उत्तर विभाग) यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणून मोलाची भूमिका बजावली. या कार्यशाळेच्या यशासाठी स्थानिक पातळीवरील सेवानिवृत्तांनी विशेष पुढाकार घेतला होता. यामध्ये प्रा. डॉ. भाऊसाहेब पवार, श्री. संजय धोंडवे, श्री. संजयकुमार शिंदे, श्री. दीपक जाधव, श्री. विश्वनाथ आल्हाट, श्री. गुलाबराव भडकवाड, श्री. भागाजी जाधव, श्री. प्रकाश जगधने, श्री. लहू खरात, श्री. शिवाजी वाबळे, श्री. शशिकांत शेलार, श्री. बाळासाहेब बोरुडे आणि प्रा. भाऊसाहेब रणपिसे यांनी विशेष परिश्रम घेतले. यासोबतच राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी येथील अनेक प्राध्यापक, अधिकारी, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी योगदान दिले.
या प्रसंगी मातंग समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सर्वांना आवश्यक ती मदत करण्यासाठी श्री. नामवाडे साहेब व श्री. भालराव स्वप्निल यांच्यासह ‘आर्टी’चा संपूर्ण अधिकारी वर्ग सक्रियपणे कार्यरत होता. या यशस्वी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजयकुमार शिंदे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर प्रा. डॉ. साहेबराव गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी ARTI च्या माध्यमातून उच्च शिक्षणाची मोठी स्वप्ने पहावीत: श्री. सुनिलजी वारे







