शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

नेवाशाचा पालखी सोहळा होणार अधिक भव्य; शासनाकडून सुविधा व निधी मंजूर

---Advertisement---

नेवासा : आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र नेवासे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यासाठी विविध शासकीय सुविधा व निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा वारकऱ्यांचा पंढरपूरकडे जाणारा पायी प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि सुव्यवस्थित होणार असल्याने वारकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दोन महिन्यांपूर्वी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पालखी मार्गावरील पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, सुरक्षा आणि मुक्कामाच्या ठिकाणांवरील आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले होते. याशिवाय विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही निधी व सुविधांबाबत मागणीपत्र सादर करण्यात आले होते.दरम्यान, गुरुवारी (दि. १४) जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, महंत देवीदास महाराज म्हस्के, कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, गणेश महाराज अरगडे, माऊली शिंदे व संपर्क प्रमुख आशिष कावरे यांच्या उपस्थितीत अधिकृत मंजुरीपत्र सुपूर्द केले. मंजूर सुविधांमध्ये पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता व फिरत्या शौचालयांसाठी ७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी १०० फिरत्या शौचालयांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.याशिवाय आरोग्य सुविधांसाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ठिकठिकाणी वैद्यकीय तपासणी केंद्रे, रुग्णवाहिका आणि आरोग्य शिबिरांची व्यवस्था केली जाणार आहे. रस्ते दुरुस्ती, विद्युत व्यवस्था, प्रकाशयोजना, वाहतूक नियोजन तसेच पोलिस बंदोबस्ताचीही विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याने यंदाचा ज्ञानेश्वरी पालखी सोहळा अधिक भव्य आणि नियोजनबद्ध होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे हजारो वारकरी बांधवांचा पंढरपूरकडे जाणारा प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment