सोनई- राज्यात डिजिटल सेवेचा गाजावाजा केला जात असताना, प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांना मूलभूत कागदपत्रांसाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून ऑनलाइन महा-ई-सेवा सेतूची वेबसाईट बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळणे ठप्प झाले आहे.
आधार कार्ड अर्ज, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला आदी कागदपत्रांशिवाय महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. मात्र वेबसाईट बंद असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून, प्रत्येक वेळी “साईट बंद आहे” हेच उत्तर मिळत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नेवासा तहसील कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक दाखल होत आहेत. अनेकांनी चार-पाच वेळा चकरा मारूनही काम न झाल्याची खंत व्यक्त केली. जाण्या-येण्यासाठी खर्च होणारा पैसा, वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास यामुळे सामान्य नागरिक हतबल झाले आहेत.
विशेष म्हणजे, महा-ई-सेवा केंद्र चालकही या परिस्थितीमुळे अडचणीत आले आहेत. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांचीही कोंडी होत असून, “सर्व्हर बंद आहे” यापलीकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न दाखवणाऱ्या यंत्रणांनी ग्रामीण भागातील वास्तव समजून घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांमध्ये अशी उदासीनता योग्य नाही. प्रवेश प्रक्रियेच्या काळातच सेवा ठप्प राहणे ही गंभीर बाब मानली जात असून, तातडीने पर्यायी व्यवस्था उभारून सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, लवकरात लवकर प्रश्न निकाली न काढल्यास विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांची होणारी फरफट थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







