शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

राजदीप सरदेसाई यांना डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार जाहीर

---Advertisement---

भारती विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिन समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार

पुणे : ख्यातनाम पत्रकार आणि प्रख्यात लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन लाख एकावन्न हजार रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारती विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिन समारंभात हा पुरस्कार सरदेसाई यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते भारती विद्यापीठाचे मुखपत्र असलेल्या ‘विचार भारती’च्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, कुलगुरू डॉ.विवेक सावजी, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह डॉ. एम.एस. सगरे आणि डॉ. के. डी. जाधव उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम रविवार १० मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, सातारा रोड, धनकवडी, पुणे येथे होणार आहे असेही डॉ. कदम यांनी सांगितले.
डॉ. कदम पुढे म्हणाले, शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत नेण्यासाठी डॉ. पतंगराव कदम यांनी ‘गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन‌’ हे ध्येय उराशी बाळगून वयाच्या १९ व्या वर्षी १० मे, १९६४ रोजी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली. डॉ. पतंगराव कदम यांची ध्येयनिष्ठा, अविश्रांत परिश्रम, गुणवत्तेचा ध्यास आणि दूरदृष्टी यांमुळे भारती विद्यापीठाच्या यशाचा आलेख सतत उंचावत राहिला. गेल्या ६१ वर्षांत भारती विद्यापीठाने देशाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात दिलेले योगदान मोलाचे आहे. देशभर शैक्षणिक संकुले असणारे, सर्व विद्याशाखांचे शिक्षण देणारे, ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा मिलाफ असणारे, महानगरांबरोबरच ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात दर्जेदार शिक्षण केंद्रे उभी करून तेथील घटकांना मुख्य प्रवाहात आणणारे, स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणारे एक वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठ म्हणून भारती विद्यापीठाचा नावलौकिक जगभर आहे.
भारती विद्यापीठाला भारत सरकारने १९९६ साली अभिमत विश्वविद्यालयाचा दर्जा दिला. गेल्या ३० वर्षांत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने गुणवत्तेच्या बळावर देदीप्यमान कामगिरी करून नामांकित विश्वविद्यालय म्हणून लौकिक मिळवला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ए-ग्रेड युनिव्हर्सिटी म्हणून उमटवलेली मोहर, नॅकने पुनर्मूल्यांकनात दिलेला अ++ दर्जा, एनआयआरएफमध्ये महाविद्यालयांनी मिळविलेले मानांकन या गोष्टी विश्वविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवणाऱ्या आहेत. भारती विद्यापीठाचे विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे बहरलेले कर्तृत्व हीच भारती विद्यापीठाच्या कार्याची खरी पावती आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment