शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

आमदारांच्या गावापासून अवघ्या चार किलोमीटरवर शेतकऱ्याचे उपोषण; तरीही कोणी फिरकले नाही

---Advertisement---

नेवासा: नेवासा तालुक्यातील माळेवाडी (वरखेड) येथील उपोषणकर्ते शेतकरी चांगदेव गंगाधर जाधव यांच्या प्रकरणामुळे प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, उपोषण सुरू असलेले वरखेड हे गाव शिरसगावपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे, आणि शिरसगाव हे स्थानिक आमदारांचे गाव म्हणून ओळखले जाते. तरीही चार दिवस उलटूनही कोणत्याही प्रतिनिधीने किंवा अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट दिली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
जाधव यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीच्या वादातून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत उपोषण सुरू केले आहे. त्यांनी पोलीस, महसूल विभाग तसेच लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने दिल्याचे सांगितले. मात्र, “कोणीही दखल घेत नाही,” अशी त्यांची व्यथा आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये आता थेट प्रश्न विचारले जात आहेत की, जेव्हा एखादा शेतकरी चार दिवस उपोषणावर बसतो, उपजीविकेचे साधन नसल्याचे सांगतो, राहण्यासाठी घर नसल्याची व्यथा मांडतो आणि मदतीसाठी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतो, तेव्हा शासन आणि लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलता दाखवणे अपेक्षित नाही का?
“सामान्य माणूस शेवटच्या आशेने आमदारांकडे जातो. कारण आमदार प्रशासनाला हलवू शकतात, अधिकाऱ्यांशी चर्चा करू शकतात आणि प्रश्न मार्गी लावू शकतात, अशी लोकांची अपेक्षा असते. पण आमदारांच्या गावाजवळच उपोषण सुरू असताना कोणीही भेट देत नसेल, तर लोकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, एखादी अप्रिय घटना घडल्यावरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का? वेळेत हस्तक्षेप करून प्रश्न सोडवण्याऐवजी दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment