चिचोंडी शिराळ : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या औषध टंचाईच्या विळख्यात सापडले असून, ग्रामीण भागातील गरिबांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लहान मुलांच्या औषधांपासून ते प्रसूतीपश्चात आवश्यक असणाऱ्या गोळ्यांपर्यंत सर्वच औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना खासगी मेडिकलमधून महागडी औषधे विकत घ्यावी लागत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.सविस्तर माहिती अशी की,मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील अनेक गावांसाठी आरोग्याचा आधारवड मानले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून येथे औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. नुकतीच समोर आलेल्या काही घटनांनुसार एका २० महिन्यांच्या बालिकेला उलट्यांचा त्रास होत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, परंतु तिथे आवश्यक औषध उपलब्ध नव्हते.पांगरमल येथील एका प्रसूती झालेल्या महिलेला तपासणीनंतर आवश्यक असणारी औषधे बाहेरून विकत आणण्यास सांगण्यात आले. खोकल्याचे सिरप, लहान बाळांची औषधे आणि विशेषतः कुत्रा चावल्यानंतरची लस उपलब्ध नसल्याच्या तक्रारींनी जोर धरला आहे.खासगी तपासण्यांचा भुर्दंडकेवळ औषधेच नव्हे, तर अनेक महत्त्वाच्या तपासण्याही खासगी लॅबमधून करून घेण्यास सांगितले जात असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. यामुळे ‘मोफत उपचार’ या सरकारी दाव्यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, “हे केंद्र रुग्णांच्या सेवेसाठी आहे की केवळ नावाला?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. मिरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले की, “जिल्हास्तरावरून औषध साठा उपलब्ध न झाल्यास आमचा नाईलाज होतो. खोकल्यासारख्या औषधांचा साठा कमी असल्याने आम्ही केवळ गरजू रुग्णांनाच ती देतो. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठीच काही वेळा औषधे बाहेरून घेण्याचा सल्ला द्यावा लागतो.” तर पाथर्डीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी या समस्येचे मूळ खरेदी प्रक्रियेत असल्याचे सांगितले. “औषध खरेदी ही राज्य आणि जिल्हा स्तरावर होत असते. स्थानिक स्तरावर आम्हाला मर्यादा आहेत. तरीही आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. नागरिकांनीही प्रशासनाकडे मागणी करावी आणि अत्यावश्यक परिस्थितीत जिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.*नागरिकांची मागणी*”शासकीय औषधे गुणकारी असतात म्हणून आम्ही खासगी दवाखाने सोडून येथे येतो, पण इथे आल्यावर औषधच मिळणार नसेल तर आम्ही जायचे कुठे?” अशी भावना शिशुपालक आदिनाथ दाणे यांनी व्यक्त केली. ग्रामीण जनतेचा संयम आता संपत चालला आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने मिरीसह तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रांवर तातडीने औषध पुरवठा करावा, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.(सूचना: बातमीसोबत वापरलेले छायाचित्र केवळ प्रतिकात्मक/काल्पनिक आहे.)
मिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा खडखडाट; रुग्ण उपचाराविना, प्रशासनाचे ‘बाहेरून औषध घ्या’चे सल्ले







