अहिल्यानगर :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांची थेट सोडवणूक करण्यासाठी शिर्डी येथे नागरिक निवेदन स्वीकृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात हा उपक्रम पार पडणार असून नागरिकांना त्यांच्या विविध समस्या, अडचणी व मागण्यांबाबत लेखी निवेदने सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमाद्वारे महसूल, जमीन, पाणी, शासकीय सेवा व इतर प्रशासकीय विषयांशी संबंधित तक्रारी व मागण्या थेट मंत्रीस्तरावर मांडण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
नागरिकांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून नागरिकांनी आपली निवेदने लेखी स्वरूपात सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.







