शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

आरोग्य क्षेत्रात परंपरा आणि आधुनिकता एकमेकांसाठी पूरक : मंत्री प्रतापराव जाधव

---Advertisement---

विद्यार्थ्यांनी कोणतेही कार्य कमी लेखू नये : मंत्री प्रतापराव जाधव

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २७ वा पदवी प्रदान समारंभ संपन्न

पुणे : आरोग्य क्षेत्रासाठी परंपरा आणि आधुनिकता या परस्पर विरोधी शक्ती नसून त्या एकामेकांना पूरक आहेत. या दोन्ही शक्तींचा जेव्हा विचारपूर्वक मेळ घातला जातो तेव्हा वैद्यकीय क्षेत्रात नव्याने क्रांती घडते, असे प्रतिपादन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २७ व्या पदवी प्रदान समारंभात स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना ते बोलत होते. राज्यसभेच्या संसद सदस्या पद्मभूषण सुधा मूर्ती यांना डी. लिट. प्रदान करण्यात आली. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. विवेक सावजी, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. अँथनी रोज, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या पदवी प्रदान समारंभात ९०६६ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली तर १४० विद्यार्थ्यांना पीएच. डी. ही पदवी आणि २७ विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला.
जाधव म्हणाले, आपण जेव्हा इतरांना यशस्वी होण्यासाठी मदत करतो तेव्हा प्रत्यक्षात स्वत:लाही यशस्वी करीत असतो. इतरांना सहकार्य करत ज्ञान आणि संसाधने यांचा योग्य वापर करून मिळणारा विजय सर्वांसाठीच उपयुक्त असतो. यश संपादन करण्यासाठी ध्येय असणे अत्यंत आवश्यक असते आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम, प्रबळ इच्छाशक्ती, वेळेचे योग्य नियोजन, उत्कृष्ट शिक्षण, ज्येष्ठांविषयी आदरभाव, सामाजिक जबाबदारीची जाणीव, नवनवीन गोष्टी स्वीकारण्याची वृत्ती आणि आत्मविश्वास या गुणांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांमध्ये दृढ निर्धार, ऊर्जा आणि महत्त्वाकांक्षा असते; परंतु त्याला उत्तम शिक्षणाची जोड न मिळाल्यास त्याचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. विद्यार्थ्यांनी कोणतेही कार्य कमी दर्जाचे मानू नये. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही,
डी. लिट. मिळाल्याबद्धल पद्मभूषण सुधा मूर्ती यांनी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, आयुष्यातील शैक्षणिक टप्पा पार करून विद्यार्थीदशेतून बाहेर पडत तुम्ही एका नवीन क्षेत्रात पदार्पण करत आहात. कुठलेही काम करताना अपयश आले तरी त्यातून पुन्हा एकदा जिद्दीने उभे राहात प्रामाणिकपणे कार्य केल्यास तुम्हाला नक्कीच यशप्राप्ती होईल. युवा पिढीमध्ये जग बदलण्याची ताकद असल्याने ती आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवू शकते. जी परिस्थिती तुम्ही बदलू शकत नाही तिचा स्वीकार करा आणि जी बदलू शकता ती बदलण्याचा प्रयत्न करा.
प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी दर्शविलेल्या पथावरून भारती विद्यापीठाचे कार्य अखंडितपणे सुरू असून देशातील एक नावाजलेली शिक्षणसंस्था म्हणून ओळखली जात आहे.
कुलगुरू डॉ. विवेक सावजी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर करताना म्हणाले, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने २०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या संस्थांशी आणि विद्यापीठांशी शैक्षणिक सहयोग करार केले आहेत यावर्षी विश्वविद्यालयाला महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांसाठी २८ कोटी हून अधिक अनुदान नामवंत संस्थांकडून मिळाले आहे.
डॉ. सुधा मूर्ती यांच्या सन्मानपत्राचे वाचन अनिता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र उत्तुरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले.

 शैक्षणिक परंपरा डॉ. पतंगराव कदम यांनी कौशल्याने पुढे नेल्या…
खऱ्या अर्थाने प्रगती साधायची असेल तर शिक्षणाचा प्रकाश समाजातील अगदी तळागाळापर्यंत पोहोचलाच पाहिजे, अशा ठाम धारणेतून डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडविली. आज भारती विद्यापीठाचे विद्यार्थी जगभरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांची ही लक्षणीय कामगिरी म्हणजे विद्यापीठाच्या अथक प्रयत्नांचेच फलित होय. महात्मा फुले, श्रीमंत शाहू छत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रात रुजवलेल्या शैक्षणिक परंपरा डॉ. पतंगराव कदम यांनी अत्यंत कौशल्याने पुढे नेल्या आणि अधिक समृद्ध केल्या आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचे ध्येय बाळगून, एक क्रांतीकारी कार्य हाती घेतले, असे गौरवोद्‌गारही प्रतापराव जाधव यांनी काढले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment