प्रशिक्षणातून प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणांवर भर..
लोणी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत ग्रामीण भागात उद्योग उभारणीस चालना देण्यामध्ये बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. शेतकरी, महिला बचत गट व युवकांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देऊन स्वावलंबनाकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केंद्राने यशस्वीरित्या पार पाडले आहे. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण दिल्याने याची व्याप्ती अधिकच वाढली.
अहिल्यानगर जिल्हात जलसंपदा मंञी तथा पालकमंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिपदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पायरेन्सच्या
कृषी विज्ञान केंद्राने गेल्या वर्षभरात १२ प्रशिक्षणांतून २९१ शेतकरी,महिला आणि युवकांना विविध अन्न प्रक्रिया उद्योगांवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले. फळ-भाज्या प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, मसाला प्रक्रिया, पापड-लोणची तयार करणे, बेकरी उत्पादन यांसारख्या क्षेत्रात शेकडो लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे अनेकांनी स्वतःचे सूक्ष्म उद्योग सुरू करून रोजगारनिर्मिती केली आहे.
योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केवळ प्रशिक्षणच नव्हे तर प्रकल्प अहवाल तयार करणे, बँक कर्ज मिळवणे, शासकीय अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, तसेच उत्पादनाचे ब्रँडिंग व मार्केटिंग याबाबतही सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे उद्योग उभारणीची संपूर्ण साखळी सुलभ झाली आहे.
केंद्राच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून, अनेक महिला बचत गटांनी उद्योग सुरू करून आर्थिक सबलीकरण साधले आहे. युवकांनाही स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने स्थलांतराचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. केंद्राच्या ह्या उपक्रमाचे कृषी प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे नोडल अधिकारी विनयकुमार आवटे यांनी विशेष अभिनंदन केंद्राचे केले आहे.
केंद्राच्या पातळीवरती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, शैलेश देशमुख, शांताराम सोनवणे, डॉ. विलाह घुले, डॉ. प्रियंका खर्डे, सज्जला लांडगे आणि डॉ. विठ्ठल विखे यांनी विशेष प्रयत्न करून “शेतमालाला योग्य दर मिळावा आणि त्यातून मूल्यवर्धन व्हावे, हा आमचा प्रमुख उद्देश आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागात उद्योजक तयार करत आहोत.”
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृषी विभाग व संबंधित यंत्रणांकडून कृषी विज्ञान केंद्राचे कौतुक होत असून, इतर जिल्ह्यांसाठीही बाभळेश्वरचे मॉडेल मार्गदर्शक ठरत आहे. भविष्यात अधिकाधिक शेतकरी व युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.







