सोनई : वारकरी संप्रदायाची पताका हातात घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांची ‘ज्ञानेश्वरी’ व संत तुकाराम महाराजांच्या ‘गाथे’ तील विचार समाजापुढे मांडत असताना देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज व राज्यातील अन्य विविध देवस्थान व मठ, मंदिराच्या १९ संत, महंतांवर घुसखोरीचा आरोप करणा-या विकास लवांडेवर गुन्हा दाखल करावा याकरीता सोनई पोलीस ठाण्यावर मुकमोर्चा काढून शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आले. किर्तनकार महाराज व शंभरहून अधिक भाविकांनी पोलीस ठाण्याच्या दारात ठिय्या मांडून निषेध व्यक्त केला.
सोनई बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर जेष्ठ किर्तनकार पंढरीनाथ महाराज तांदळे व आचार्य शुभम महाराज कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुक मोर्चा काढण्यात आला. पोलीस ठाण्याच्या आवारात तांदळे महाराज, पोपटराव आघाव, आकाश महाराज धाकतोडे, कांडेकर महाराज व आबा मुळे यांचे भाषण झाले. पुजनीय भास्करगिरी बाबांवर झालेला आरोप निंदनीय असून पोलीस प्रशासनाने आहे ते वास्तव लक्षात घेऊन लवांडेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
नेहमी वारकरी संप्रदायाच्या कार्यात व्यस्त राहून संतांचे चरित्र, ग्रंथातील विचार आणि चांगल्या विचारांची पेरणी करीत असलेल्या वीस संत,महंतांचे नाव घेऊन लवांडे यांनी केलेला घुसखोरीचा आरोप सर्वानाच जिव्हारी लागला आहे. मात्र शांततेच्या मार्गाने भावना व्यक्त करीत असल्याचे कांडेकर महाराज यांनी सांगितले. महंत भास्करगिरी महाराज यांचे समर्थन म्हणून मुस्लिम व ख्रिश्चन बांधव निवेदन देत आहेत यातच त्यांचे कार्य दिसून येते अशी भावना व्यक्त करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी आपली भावना वरिष्ठांपर्यंत कळविली जाईल असे अश्वासन दिले.
सोनईतील ठिय्या अंदोलनात विकास लवांडेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी







