राहाता : राहाता येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर ज्ञान, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांनी उजळून निघाला होता. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वाणिज्य विभागातील डॉ. सुरेश पुलाटे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेत, त्यांच्या संघर्षमय प्रवासातून उभा राहिलेला विचारांचा दीप आजही समाजाला दिशा देत असल्याचे अधोरेखित केले. “शिक्षण हेच खरे स्वातंत्र्याचे शस्त्र आहे” या बाबासाहेबांच्या विचारांची उजळणी करत त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नारायण गुळवे यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर असल्याचे सांगितले. त्यांच्या शब्दांतून बाबासाहेबांविषयीचा गाढ आदर आणि प्रेरणा स्पष्टपणे जाणवत होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक परिवर्तनातील योगदान अधोरेखित केले. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. सत्यजित पोतदार यांचीही उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश सातपुते, यश पाळंदे व कु. प्रीती बनसोडे यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकेत नळे यांनी सुत्रसंचालन कु. दिव्या बागडे तर आभार उत्सव समिती प्रमुख प्रा.शुभांगी जगताप यांनी मानले.
यावेळी डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांविषयी अभ्यासाची व चिंतनाची प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहाता महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न







