रेल्वेकडून अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा
डुंगरवाल यांच्यासह नागरिकांनी सुजय विखे पा. यांची घेतली भेट
श्रीरामपूर : परिसरात प्रस्तावित रेल्वे मालधक्का प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल रेल्वेकडून अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा देण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना अचानक विस्थापित करण्याचा प्रयत्न होत असल्याने तसेच प्रस्तावित मालधक्क्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे व स्थानिक नागरिकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी नागरिकांनी स्पष्टपणे मांडणी करत सांगितले की, प्रस्तावित रेल्वे मालधक्का प्रकल्पाच्या नावाखाली कोणत्याही कुटुंबाचे विस्थापन होऊ नये, यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्यात यावा. तसेच, सर्वसामान्य कुटुंबांचे निवासस्थान सुरक्षित राहावे याबरोबरच प्रस्तावित रेल्वे मालधक्क्यामुळे उडणारी धूळ, दुर्गंधी व वाढते प्रदूषण यामुळे स्थानिक रहिवाशी, शाळा–कॉलेजमधील विद्यार्थी तसेच रुग्णालयातील रुग्ण यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. म्हणूनच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून रेल्वे मालधक्का हा गावाच्या बाहेरील भागात उभारण्यात यावा व यासाठी विखे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी खासदारांकडून नागरिकांच्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आश्वासन देण्यात आले असून, या विषयात योग्य तो तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.
नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार असून, कोणत्याही परिस्थितीत अन्यायकारक विस्थापन सहन केले जाणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे, प्रसाद कटके, युवराज घोरपडे, गणेश भाडंगे, अभिजित मोरे, मुबारक शेख, भागवत घुगे, सोमनाथ पवार, राहुल शेटे, काळे पाटील आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते.







