योजना रखडल्याने रस्त्यांची कामेही खोळंबली
श्रीरामपूर : जलजीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदमार्फत प्रगतीपथावर असलेल्या ‘पंतप्रधान जलजीवन मिशन’ अंतर्गतच्या पाणी पुरवठा योजनांची कामे निधी अभावी ठप्प झाली आहेत. देयके थकल्याने संबंधित ठेकेदारांनी उर्वरीत कामे करण्यास असमर्थता दर्शविली आहे.
थकीत देयके अदा केल्याशिवाय तसेच पुरेसा निधी उपलब्ध केल्याशिवाय ठेकेदार कामे करण्यास तयार नाहित. सदरच्या पाणी पुरवठा योजनांची कामे रखडल्याने गावातील अंतर्गत रस्त्यांची कामेही खोळंबली आहेत. त्यामुळे शासनाने सदरच्या योजनांची कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करावा अशी मागणी नगरपालिका, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून केली जात आहे. केन्द्र शासनाच्या ‘पंतप्रधान जलजीवन मिशन” या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे सुरु आहेत.यातील बहुतांश योजनाची कामे सहा महिन्यांपासून निधी नसल्याने ठप्प झाली आहेत. केन्द्र शासनाने त्यांच्या निधीची रक्कम यापूर्वीच दिलेली आहे.माञ राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम प्रलंबित आहे. राज्य शासनाने केन्द्दाकडे वाढिव निधीची मागणी केली असता केन्द्र शासनाने अतिरिक्त निधी देण्यास नकार दिल्याने राज्य शासनापुढे निधीची उपलब्धता करणेबाबात आर्थिक अडचणींमुळे पेच उभा ठाकला आहे. पाणी पुरवठा योजनांची कामे अर्धवट राहिल्याने शहर वा गाव अंतर्गतची रस्त्यांची कामे देखिल खोळंबली आहेत. रस्त्यांची कामे केली व पाणी पुरवठा योजनांची कामे पुन्हा सुरु झाली तर पाईप लाईन टाकणेसाठी रस्ते खोदावे लागतील. यामुळे रस्त्यांसाठीचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.रस्त्यांची कामे सुरु करता येत नसल्याने स्थानिक प्रशासनाला हकनाक रोष पत्कारावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाने गांभिर्याने लक्ष घालून पुरेशा निधीची उपलब्धता करावी अशी मागणी केली जात आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना निधीअभावी ठप्प







