पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा महात्मा फुले यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली – मंत्री छगन भुजबळ
बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य – मंत्री छगन भुजबळ
नाशिक :- बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा महात्मा फुले यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती जयंती वर्षानिमित्त पुणे जिल्हा परिषद अंतर्गत खानवडी ता. पुरंदर जि. पुणे येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ज्योती सावित्री जिल्हा परिषद सीबीएससी शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील,मंत्री दादाजी भुसे, मंत्री अतुल सावे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार योगेश टिळेकर, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकर मांडेकर, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रसाद सिंग, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, खानवडी ग्रामपंचायत प्रशासक स्वप्नाली होले यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले यांच्या जन्मतिथीबाबत संशोधनातून ११ एप्रिल १८२७ ही तारीख निश्चित झाली आहे. सावित्रीबाई फुले यांनी १८९१ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ या ग्रंथात या तारखेचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच होते. त्याच विचारातून खानवडी येथे उभारलेली ही आधुनिक सीबीएसई शाळा ही त्यांच्या कार्याची पुढची पायरी आहे. महात्मा फुले हे ‘नेशन बिल्डर’ होते तसेच अंधश्रद्धा आणि ब्राह्मण्यवादी प्रवृत्तींच्या विरोधात लढणारे विचारवंत होते. त्यांच्या कार्यात विविध समाजघटकांनी सहभाग घेतला होता. महात्मा फुले ब्राम्हण विरोधी होते असं विपर्यस्त चित्रण केलं गेलेलं आहे. जोतीरावांच्या ब्राह्मण समाजाविषयीच्या लेखनाचा सोयिस्करपणे वापर करण्यात आलेला आहे. वास्तवात फुलेंचा विरोध ब्राम्हण व्यक्तीला-जातीला नव्हता तर ब्राम्हण्यवादाला होता हे लक्ष्यात घ्यावे.जोतीरावांचे कितीतरी आप्तमित्र आणि सहकारी ब्राह्मण होते.त्यात भांडारकर, सदाशिव गोवंडे, भिडे, वाळवेकर, केशवराव भवाळकर, सखाराम परांजपे,मोरो विठ्ठल वाळवेकर,तुकाराम पडवळ,दादोबा तरखडकर कृष्णशास्त्री चिपळूणकर, हरीरावजी चिपळूणकर,न्या.रानडे, लोकहितवादी अशा अनेकांचा समावेश होता.त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समतेचा आदर्श निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा त्यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली असल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.







