बाभळेश्वरच्या कृृृषि विज्ञान केंद्रात दुग्धव्यवसाय प्रशिक्षण
लोणी : दुग्ध व्यवसाय हा कष्टाचा असला तरी यामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करत असताना नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांनी समजून घेतानाच दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्टिकोन आणि व्यावसायिकता जपण्याचे काम करावे असे प्रतिपादन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बाबासाहेब गुंड यांनी केले.
जलसंपदा मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डाॅ.उत्तमराव कदम, पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर आणि केंद्राचे प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय अधिक आधुनिक, वैज्ञानिक आणि नफ्याचा बनवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र पायरेन्स बाभळेश्वर येथे दोन दिवसीय दुग्धव्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम ते बोलत होते.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी कृषी विज्ञान केंद्राचे पशुवैद्यकीय विभागाचे डॉ विठ्ठल विखे यांनी दुग्ध प्रक्रिया, मूल्यवर्धन व बाजारपेठेतील संधी याविषयीही उपयुक्त माहिती दिली.
दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, जनावरांचे संगोपन, संतुलित आहार व्यवस्थापन, विविध रोगांचे प्रतिबंध व नियंत्रण, तसेच दुग्ध उत्पादन वाढविण्याच्या प्रभावी उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन पशुवैद्यकीय डॉ.बाबासाहेब गुंड यांनी केले.
तर सज्जला लांडगे यांनी दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती याची प्रत्यक्ष याची माहिती देत असताना शेतकऱ्यांनी केवळ तू न काढता प्रक्रिया उद्योगाकडे वळावे आणि त्याचे मार्केटिंग समजून घ्यावेत असे सांगितले. डॉ. प्रियंका खर्डे यांनी व्यक्तिमत्व विकास,संवाद कौशल्य, समूह संघटन यावर मार्गदर्शन केले
सदर प्रशिक्षणादरम्यान संवादात्मक चर्चासत्रे आणि शंका निरसन सत्रांमुळे सहभागी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.
समारोप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना केंद्राचे मृदा विभाग प्रमुख शांताराम सोनवणे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दुग्धव्यवसाय अधिक सक्षम व टिकाऊ करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून उत्पन्नवाढ साध्य करावी, असेही त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये दुग्धव्यवसायाविषयी नवे दृष्टिकोन निर्माण झाले असून, हा व्यवसाय अधिक शाश्वत व फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात ममदापूर, ता. येवला, जिल्हा नाशिक येथील ५० शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विस्तार विभागाच्या डॉ प्रियंका खर्डे यांनी केले.







