श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा :तालुक्यासह शहरात वाढलेले अवैध व्यवसाय तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी रिपाई आठवले महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख रमादेवी धिवर यांच्यासह अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गांधी पुतळा येथे सुरू केलेले उपोषण काल पोलीस अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सोडण्यात आले.शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसाय सुरू आहे. हे सर्व अवैध व्यवसाय हॉटेल, टपऱ्याच्या आडोशाला खुलेआम चालू आहे. शहरामध्ये कित्येक ठिकाणी गावठी दारुचे उत्पादन व विक्री खुलेआम केली जाते. तसेच तालुक्यातीलगोदावरी नदीकाठच्या गावामध्ये चालू असणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे शहरामध्ये वाळू चोरीच्या सक्रीय टोळ्या तयार होऊन गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरात काही ठिकाणी केमिकलयुक्त भेसळ दूध निर्मिती व विक्री केली जाते. या सर्व प्रकारांना वेळीच आळा घालावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरु केले होते. मात्र पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडले असल्याचे श्रीमती धीवर यांनी सांगितले.उपोषणात शहर प्रमुख उज्ज्वला येवलेकर, अन्याय अत्याचार निर्मूलनच्या शोभा पातारे, सुनिता वढणे, आशा पाळंदे, गिरजा शिंदे, मुमताज सय्यद, ज्योती पलघडमल आदींनी सहभाग घेतला होता.
पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर श्रीरामपुरात अवैध व्यवसाया विरोधात उपोषण सोडले







