चिचोंडी शिराळ : करंजी-चिचोंडी ते पांढरीपूल या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर सध्या अपघातांचे सत्र सुरू झाले असून, याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची अनास्था आणि वाढते अनाधिकृत खोदकाम जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध आता शिराळ आणि परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिचोंडी ते पांढरीपूल रस्त्यावरील शिराळ आणि आव्हाडवाडी दरम्यान असलेल्या गडाख वस्तीजवळ एका शेतकऱ्याने रस्ता अनधिकृतपणे खोदून त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या खोदकामामुळे रस्त्यावर मधोमध मोठमोठे खड्डे पडले असून, ते एखाद्या अनपेक्षित स्पीड ब्रेकरसारखे भासत आहेत. हा भाग वळणाचा असल्याने वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वारांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अनेक अपघात होऊन वाहनधारक गंभीर जखमी झाले आहेत.
‘दोन महिन्यांपूर्वी केलेली मलमपट्टी, आठ दिवसांतच उखडली’
सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे सोपस्कार पार पाडले होते. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.अवघ्या आठ दिवसांत परिस्थिती जैसे थे:खड्डे बुजवल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच रस्ता पुन्हा उखडला गेला.
ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुन्हा दुरुस्तीचे आश्वासन दिले होते, मात्र दोन महिने उलटले तरी अद्याप एकही खडा हललेला नाही.
“प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे आता एखादी मोठी प्राणघातक दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का?” असा संतप्त सवाल शिराळ परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना कंटाळलेल्या शिराळ ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून,अनाधिकृत खोदकाम करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई व्हावी. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करावा.
प्रशासकीय बाजू : या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,”ज्या शेतकऱ्याने अनाधिकृतपणे रस्ता खोदला आहे, त्यांना जाब विचारून नोटीस बजावण्यात येईल व योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल. तसेच, ज्या ठिकाणी खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत, त्या संबंधित ठेकेदाराला कडक सूचना देऊन तातडीने दुरुस्ती करून घेतली जाईल.”
– आसिफ सय्यद,
सार्वजनिक बांधकाम विभाग, शाखा अभियंता पाथर्डी.







