भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण व समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल होत आहे; शिक्षण म्हणजे फक्त उत्तरांसाठी अभ्यास करणे नव्हे शिकण्याचे भविष्य चिकित्सक विचारक्षमतेत आहे असे प्रतिपादन जेआयएस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नीरज सक्सेना यांनी केले. ते धनकवडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिस्पॉन्सिबल, रिस्क अवेअर अँड रेग्युलेटेड एआय’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कोलकत्ता टेक्नो इंटरनॅशनल न्यू टाउनचे प्रा. निलंजन डे, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप, सहकार्यवाह डॉ. एम. एस. सागरे, सौ. स्वप्नाली कदम, प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, डॉ. सुनीता जाधव, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. के. बी. सुतार उपस्थित होते. प्रसंगी ‘सुव्हेनियर’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. सक्सेना पुढे म्हणाले, पारंपरिक अभ्यासक्रम, वर्गखोल्या व परीक्षा यांचे महत्त्व क्रमशः कमी होत असून त्याऐवजी कौशल्याधिष्ठित शिक्षण, चिकित्सक विचारशक्ती आणि समस्या निराकरण क्षमता यांवर भर देणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकत नाही अशा बाबींवर आधारित शिक्षणपद्धती विकसित करण्याचे त्यांनी आवाहन केले. डॉ. निलांजन डे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व क्षेत्रात व्यापली गेली असून ‘सिंथेटिक डेटा’ पडताळणी न करता वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातून ‘डार्क डेटा’ निर्माण होऊन पुढे चुकीच्या माहितीमुळे निष्कर्षही चुकीचे येऊ शकतात, असे अनेक धोके निर्माण होऊ शकतात. तसेच संशोधनात AI कडून होणाऱ्या चुकीच्या संदर्भनिर्मितीबाबत (hallucinations) त्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.
डॉ. अस्मिता जगताप म्हणाल्या, कृत्रिम बुद्धिमत्तेत नैतिकता महत्त्वाची असून “नैतिकतेशिवाय बुद्धिमत्ता धोकादायक ठरते, दिशेविना वेग विघातक ठरू शकतो तर जबाबदारीविना उपक्रम हानिकारक ठरू शकतो.” विशेषतः आरोग्य, शिक्षण आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रांत AI चा वापर करताना मानवी संवेदनशीलता व उत्तरदायित्व या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
डॉ. विवेक सावजी म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीपूर्वक व नियमबद्ध वापर करणे अत्यावश्यक आहे. अशा परिषदांमुळे विचारविनिमयातून परिणामकारक निष्कर्षापर्यंत पोहचण्यास मदत होते. भारती विद्यापीठ नेहमीच सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास कटिबद्ध असते. डॉ. राजेश प्रसाद यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळालेल्या विविध मान्यता व यशांविषयी माहिती दिली. या दिवसीय परिषदेत २४ समांतर सत्रांमधून एकूण ४०३ संशोधननिबंध सादर करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये अभिनव उपक्रम, सर्जनशीलता व प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी महाविद्यालयाने AICTE च्या मान्यतेने उभ्या केलेल्या IDEA या प्रयोगशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सुनीता जाधव यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन डॉ. प्रियांका पायगुडे व डॉ. हर्षदा मेत्रे यांनी केले. आभार डॉ. के. बी. सुतार यांनी मानले. डॉ. डी. जी. कुंभार व डॉ. सुनीता धोत्रे यांनी IDEA प्रयोगशाळेच्या सुविधा व कार्यपद्धतीविषयी माहिती दिली.







