शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्रीरामपुरातील डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे काम लवकरच

---Advertisement---

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही

श्रीरामपूर (प्रतिनिधी )- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या श्रीरामपूर येथील पूर्णाकृती पुतळ्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याचे
भाजपचे श्रीरामपूर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांनी सांगितले.
पालकमंत्री विखे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेत नुकतीच आढावा घेतली. यावेळी साळवे यांनी श्रीरामपूरच्या विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी महाराष्ट्र सरकारने दिल्याबद्दल तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम सुरू झाल्याबद्दल पालकमंत्री विखे पाटील यांचे अभिनंदन करून महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबतच्या अडचणी दूर करून तातडीने पुतळ्याचे काम सुरू करण्याची मागणी पालकमंत्री विखे यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी शासन स्तरावरील सर्व अडचणी दूर करून महामानव डॉ. आंबेडकर पुतळ्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले. श्रीरामपूर रेल्वे स्थानक व लुंबिनी बुद्ध विहारासमोर गेल्या अनेक वर्षांपासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. माजी आमदार जयंत ससाणे यांच्या प्रयत्नातून या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करून डॉ. आंबेडकर स्मारक विकसित करण्यात आले आहे. दरम्यान श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेऊन श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत याबाबतचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार दोन्ही पूर्णाकृती पुतळ्यांसाठी श्रीरामपूर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे. दोन्ही पुतळे बनविण्याचे काम नाशिक येथील शिल्पकारास देण्यात आले. नगरपालिकेच्या सूचना व आदेशानुसार हे पूर्णाकृती पुतळे तयार करण्यात आले आहेत. हे पुतळे श्रीरामपुरात बसविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे तरतूद देखील करण्यात आली आहे.
यापैकी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारून शिवसृष्टी उभारण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. डॉ. आंबेडकर पुतळा असलेली जागा श्रीरामपूर नगरपालिकेच्या ताब्यात नसून या जागेच्या महसुली कागदपत्रानुसार या जागेवर वन विभागाची नोंद लागल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निर्वनीकरण करून महसूल प्रशासनाकडून ही जागा श्रीरामपूर नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया रखडली. या जागेची निर्वनीकरण नोंद शोधून जागा नगरपालिकेच्या ताब्यात देण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. पण त्यानंतर देखील वन विभागाची नोंद हटलेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे, शिवसृष्टीचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर लवकरच डॉ. आंबेडकर पुतळ्याचे काम सुरू करण्याची ग्वाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्याने आंबेडकरी अनुयायांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान पुतळ्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने साळवे यांच्यासह भीमशक्ती संघटनेचे संदीप मगर तसेच दत्तनगर ग्रामपंचायतीचे सदस्य किरण खंडागळे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक लोंढे आदींनी पालकमंत्री विखे पाटील यांना निवेदन दिले. त्यावर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment