- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत भव्य स्पर्धेचा शानदार शुभारंभ
ठाणे : श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे १०१ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३ व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला १४ एप्रिलपासून प्रारंभ झाला.
स्पर्धेचे उदघाटन १४ एप्रिल रोजी वाजता प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य), शर्मिला रोहित पिंपळोलकर (ठाणे महापौर) यांच्या हस्ते झाले . यावेळी विशेष अतिथी म्हणून विक्रम गोपीनाथ पाटील (चेअरमन पारसिक जनता सहकारी बँक ), हेमंत पवार (शिवसेना ठाणे शहर प्रमुख), सुधीर कोकाटे (नगरसेवक) हे उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १८ एप्रिल रोजी रात्रौ ९:०० वाजता संजय केळकर (आमदार), निरंजन डावखरे (आमदार) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून संदीप लेले (भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ), कृष्णा पाटील (ठाणे उप महापौर), संजय वाघुले (नगरसेवक) हे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत पुरुष गटात ७१ संघानी व महिला गटात ३९ संघानी भाग घेतला आहे. स्पर्धेतील सामने बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी पुरुषांची ४ आणि महिलांची २ क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. कबड्डी प्रेमींना सामन्यांचा आनंद घेता यावा म्हणून खास प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे.
या स्पर्धेत पुणे, धुळे,नांदेड , रायगड, पालघर, ठाणे , मुंबई उपनगर , मुंबई शहर ह्या जिल्ह्यातील नामवंत संघांचा सहभाग आहे. गतवर्षी पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळाने सतेज संघ पुणे संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. महिला गटात अंतिम सामन्यात डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबसंघाने शिवशक्ती महिला संघाचा पराभव केला होता.
स्पर्धेत पुरुष गटात गतविजेते स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), चेंबूर क्रीडा केंद्र (मुंबई उपनगर), शिवशंकर क्रीडा मंडळ (ठाणे), जय बजरंग स्पोर्ट्स क्लब (ठाणे), गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर), श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळ(मुंबई शहर), TIPL क्लब पनवेल (रायगड), भारत भूषण (पुणे), श्री राम कबड्डी संघ विरार (पालघर), साई कृपा क्रीडा मंडळ (पालघर) ह्या बलाढ्य संघांचा समावेश आहे. तसेच महिला गटात गतविजेते डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर), शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर), टागोर नगर मित्र मंडळ (मुंबई उपनगर), स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), रा फ नाईक नवी मुंबई (ठाणे), शिवतेज क्रीडा मंडळ (ठाणे), शिवसाई स्पोर्ट्स क्लब (पालघर), शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब (धुळे), मिडलाईन अकॅडमी (नांदेड) ह्या नामवंत संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेत एकूण रू. ३,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेत पुरुष व महिला गटात विजेत्या संघाला ₹ ५१,०००/- , उपविजेत्या संघाला ₹ ३१,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ ११,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पुरुष गटात व महिला गटात उत्कुष्ट खेळाडूस ₹ ५,०००/- , उत्कुष्ट चढाईपट्टू खेळाडूस ₹ ३,०००/- व उत्कुष्ट पक्कड करणाऱ्या खेळाडूस ₹ ३,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस ₹ १,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, खेळाडू व कार्यकर्ते अथक मेहनत घेत आहेत. तरी, ठाण्यातील कबड्डी प्रेमींनी स्पर्धेला उपस्थित राहून या खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे करण्यात आले आहे.








