एमसीए अकादमीचा राजवीर लाड : सामनावीर
- एलआयसी कल्पेश गोविंद कोळी क्रिकेट स्पर्धा
मुंबई : मुंबई क्रिकेटची समृद्ध परंपरा जपणाऱ्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आयोजित ३४ व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामने अत्यंत रोमहर्षक झाले. पालघर केंद्राने शुभम पिंपळेच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर बोईसर केंद्रावर ९ विकेट्स शिल्लक राखून विजय मिळवला.
बोईसर येथील टाटा स्टील क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या सामन्यात बोईसर केंद्राचा पहिला डाव १२७ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर पालघर केंद्राने १७२ धावा केल्या होत्या. त्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशी बोईसर केंद्राला अवघ्या ८२ धावांवर रोखत विजयासाठीचे ३८ धावांचे आव्हान एक गडी गमावून पार करत पालघर केंद्राने छाप पाडली. शुभम पिंपळे याने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ३ विकेट्स मिळवत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
चर्चगेट केंद्राने कलिना केंद्रावर १० बळी राखून सहज विजय मिळवला. जय म्हात्रेची उत्कृष्ट गोलंदाजी विजयात महत्त्वपूर्ण ठरली. कलिनाच्या एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात कलिना केंद्राला पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावातही ९० धावांवर रोखल्यानंतर चर्चगेट केंद्राने पहिल्या डावात १४९ धावा केल्या होत्या. त्यानंतर विजयासाठीचे ३२ धावांचे आव्हान त्यांनी १० षटकांत पार करत पहिल्या विजयाची नोंद केली. दोन्ही डावांत १० बळी मिळवणारा जय म्हात्रे सामनावीराचा मानकरी ठरला.
बोरिवली केंद्राने कांदिवली केंद्राचा पहिला डाव २२६ धावांवर आटोपल्यानंतर पहिल्या डावात ४१३ धावा करत मोठी आघाडी घेतली. माटुंग्याच्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबवर झालेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी, अरहम जैनने ११८ चेंडूंत ९ चौकार आणि ७ षटकारांसह ११७ धावांची खेळी केली. त्याला साहिर हसन (५६), मानवीर जैन (५१), लक्ष्मण प्रसाद विश्वकर्मा (३७) यांचीही मोलाची साथ लाभली. याच आघाडीच्या बळावर त्यांनी पहिल्या डावात विजय साकारला.
चेंबूरच्या आरसीएफ स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या एमसीए अकादमी आणि घाटकोपर केंद्र यांच्यात झालेल्या सामन्यात देवाशीष घोडके याने १६० धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. घाटकोपर केंद्राचा पहिला डाव १०८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर एमसीए अकादमीने ३०५ धावा केल्या. त्यात देवाशीषने १९४ चेंडूंत १६ चौकार आणि ३ षटकारांसह केलेल्या १६० धावांचा समावेश आहे. त्यामुळे एमसीए केंद्राला पहिल्या डावात १९७ धावांची भलीमोठी आघाडी घेता आली. दुसऱ्या दिवसअखेर घाटकोपर केंद्राने प्रज्ञांकुर भालेरावच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ बाद १८१ धावा केल्या. पहिल्या डावात ९ बळी घेणारा राजवीर लाड सामनावीराचा मानकरी ठरला.








