मुंबई : गझलसम्राट स्व. सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त अभंग क्रीएटिव्ह, पार्थ थिएटर प्रस्तुत आणि सिनेरंग फाऊंडेशनच्या वतीने स्त्री गझलकारांचा ‘गझल माझी सखी’ हा मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १६ एप्रिल रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी लघु नाट्यगृह, तिसरा मजला, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले होते.स्काय रुट मीडिया आणि मीडिया माईंड क्रिएशन यांचे विशेष सहकार्य लाभलेल्या या कार्यक्रमात खान्देशातील ज्योत्सना राजपूत, पनवेलमधील सुनिता रामचंद्र, पंढरपूरमधील राधिका फराटे, रत्नागिरीतील श्रद्धा खानविलकर, वसईतील स्वाती शुक्ल या गझलकार महिलांनी विविध गझल सादर केल्या. सासर आणि माहेर असे दोन्ही घरं सांभाळताना महिलेची होत असलेली तारांबळ यावर आधारित खान्देशातील ज्योत्सना राजपूत यांनी सादर केलेली “दु:खावरती स्वतःच फुंकर घालत असतें बाई, काट्यानाही फुलासारखे माळत असते बाई, माहेराचे कौतुक असते अन सासरचा तोरा, दोन चाळण्या मध्ये स्वतःला चाळत असते बाई”. ही गझल सर्व रसिक स्त्री वर्गाच्या मनात घरं करून गेली. तर, सध्या शहरातील धक्काधक्कीच्या जीवनात गाव कुठे तरी मागे राहिले आहे. गावी जाण्याची ओढ आहे परंतू, कामामुळे शक्य नाही. ही परिस्थिती उलगडून सांगणारी “शहर भोगणे अजून आपले संपत नाही, गावी जायचे म्हणतो नुसते ठरवत नाही, रानफुलांचा वसा वारसा घेऊन जगलो कुंडीमध्ये कसे रुजावे समजत नाही…. ही गझल पनवेलमधील सुनिता रामचंद्र यांनी सादर केली. “मनात ज्ञाना तुकारुजवल्यानंतर,बसल्याजागी वारी करता येते” या गझल च्या सादरीकरणातून रत्नागिरीतील श्रद्धा खानविलकर यांनी वारी चा प्रवास उलगडला. प्रेम, अनुभव, स्वाभिमान आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी “नको आवाज द्या तू अता कोमात आहे”… ही गझल पंढरपूरमधील राधिका फराटे यांनी सादर केली. तसेच वसईतील स्वाती शुक्ल यांनी अपूर्ण राहिलेले प्रेम आणि शेवटच्या भेटीची आस व्यक्त करणारी “टाळले तू टाळण्याची कारणे देऊन जातेवढ्यासाठी तरी तू एकदा भेटून जा… ही गझल सादर केली. या स्त्री गझलकारांच्या ‘गझल माझी सखी’ या सुंदर कार्यक्रमाचे निवेदन मंगेश सातपुते यांनी केले.
स्त्री गझलकारांच्या मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद








