मुंबई – ३४व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी युवा खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. एमसीएचे संयुक्त सचिव निलेश भोसले यांच्या हस्ते झालेल्या नाणेफेकीनंतर बोलताना मुझुमदार म्हणाले, “मोठी स्वप्नं पाहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी स्वतःचे उच्च निकष ठेवा. फक्त ३०-४० धावा करून समाधानी राहू नका, दम असेल तर द्विशतक ठोका. दोन-तीन विकेट्सवर थांबू नका, सात-आठ विकेट्स घेण्याची जिद्द ठेवा. तेव्हाच तुम्ही गर्दीतून वेगळे दिसाल. यावेळी मुझुमदार यांनी आपल्या क्रिकेट प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत, याच मैदानावर मी वाढलो, खेळलो आणि क्रिकेटची स्वप्नं पाहिली,असे सांगितले. मुंबई क्रिकेटची परंपरा आणि उच्च दर्जा कायम राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात अनेक नवे रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








