- ‘युथ टॅलेन्ट सर्च ‘ घोषवाक्य सार्थ ठरवणारी स्पर्धा
मुंबई : माटुंगा येथील न्यु हिंद स्पोर्टिंग क्लबतर्फे आयोजित ३४ व्या एलआयसी कल्पेश कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला येत्या २ मे, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील १६ वर्षाखालील खेळाडूंमध्ये ही स्पर्धा घेण्यात येते. यंदा स्पर्धेत १६ संघांचा सहभाग असून त्यांची ४ गटात विभागणी करण्यात आली आहे. सर्व सामने २ दिवसांचे असतील. ते साखळी आणि बाद पद्धतीने खेळवण्यात येतील. या स्पर्धेत एकूण २७ सामने होणार आहेत. २ ते २३ मे दरम्यान या स्पर्धेतील सामने कांदिवली, विरार, डहाणू, चेंबूर, कलिना, माटुंगा आणि नवी मुंबई येथील विविध मैदानांवर आयोजित करण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीचे सामने २ व ३ मे रोजी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन २ मे रोजी सकाळी ८.३० वाजता माटुंगा येथील मेजर रमेश दडकर मैदानात संपन्न होईल. भारताची महिला कसोटी वीर सायली सातघरे, एलआयसीचे अधिकारी योगेंद्र वैती यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता माटुंगा येथेच स्पर्धेचा बक्षिस समारंभ एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते संपन्न होईल. भारताचे माजी कसोटीवीर उमेश कुलकर्णी यांना स्व. अशोक प्रधान जीवनगौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार शरद कद्रेकर यांना स्व. वि. वि. करमरकर पुरस्काराने गौरविण्यात येईल. स्पर्धेतील सर्व खेळाडू, पंच यांना वैयक्तिक विमा संरक्षण देण्यात आले आहे. स्पर्धेने देश -विदेशी क्रिकेटला टँलेन्टेड खेळाडू दिले गेल्या 33 वर्षात देश आणि विदेशातील क्रिकेट संघांना प्रतिभावंत क्रिकेटपटू मिळवून देणारी स्पर्धा म्हणून कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेने आपले नाव सार्थ ठरवले आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणारा रोहित शर्मा सूर्यकुमार यादव ,युवा विश्वविजेता कर्णधार आयुष म्हात्रे,अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर,हरमीत सिंग युगांडाचा अल्पेश रामजानी ,नेपाळचा शक्ती गौचन आणि यूएईचा स्वप्नील पाटील या नामवंत क्रिकेटपटूंनी आपल्या क्रिकेटचा श्रीगणेशा कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धंतूनच गिरवला. या 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेला नावारूपाला आणून स्पर्धेतून होतकरू क्रिकेटपटू देशाला मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ ‘महागुरू’ गोपाळ कोळी स्पर्धेचे संयुक्त सचिव चंद्रकांत कोळी, युवा संघटक आणि आंतराष्ट्रीय ख्याती प्राप्त करणारा छायाचित्रकार प्रतीक कोळी, सचिन कोळी, सोनाली ठाणेकर हे क्रीडा संघटक गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. यंदा या स्पर्धेतील पंच आणि खेळाडूंना न्यू इंडियन ऍश्युरंस कंपनीकडून वैयक्तिक विमा कव्हरही पुरविण्यात येणार आहे. एकूणच या स्पर्धेने 33 वर्षांत ‘युथ टॅलेन्ट सर्च ‘ हे आपले घोषवाक्य सार्थ ठरवले आहे.








