आदिल हा देशाच्या अस्मितेचा जाज्वल्य दीप – उपमुख्यमंत्री शिंदे
जम्मू-काश्मीर :“धर्म, भाषा आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी स्वतःचा जीव अर्पण करणारा आदिल हा केवळ एक तरुण नव्हे, तर देशाच्या अस्मितेचा जाज्वल्य दीप आहे,” असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. “एका आईचा मुलगा, एका कुटुंबाचा आधार क्षणात हिरावला गेला… पण मानवतेसाठी दिलेलं हे बलिदान देश कधीच विसरणार नाही, ते इतिहासात कोरलं गेलं आहे,” असं हे शिंदे यांनी स्पष्ट केले.
पहेलगाम येथे शहीद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत आर्थिक मदत आणि नवीन घर सुपूर्द केले. या भावनिक आणि अभिमानाच्या क्षणाला आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.
शिवसेनेच्यावतीने आदिल यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत आणि पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते वचन पूर्ण करत उभारण्यात आलेल्या नव्या घराला “आनंद नाथ भवन” असे नाव देण्यात आले असून, ते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.
“हे घर केवळ निवारा नाही, तर एका वीराच्या बलिदानाचा सन्मान आहे,” असे ठामपणे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आदिल यांच्या कुटुंबीयांनी भावना व्यक्त करत सांगितले, “एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केले. त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली आणि घरही बांधून दिले. हे घर आमच्यासाठी केवळ निवारा नसून सन्मान आणि आधार आहे.” आदिल यांच्या बहिणीने आणि भावाने यावेळी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी शिंदे यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाठ, मंत्री योगेश कदम, शिवसेना सचिव कॅप्टन अजित अडसूळ, सरहद्द संस्थेचे संचालक संजय नहार, मराठवाडा युवा सेनेचे बाजीराव चव्हाण, युवासेना सचिव कोकण विभाग विकास गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य अभिमन्यू खोपकर, अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रमीज रजा, अप अधीक्षक फारुख अहमद,
जम्मू-काश्मीर शिवसेना प्रमुख अश्विनी कुमार गुप्ता, राज्य सचिव मोहम्मद शकील मोगरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री शिरसाट आणि कदम यांच्या हस्ते आदिलच्या कुटुंबियांना घर सुपूर्द
शिवसेनेच्या वतीने बांधण्यात आलेले घर आदिल सय्यद यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पहलगाम जिल्ह्यातील हाफतनार या त्यांच्या मूळ गावी उपस्थित राहिले.यावेळी योगेश कदम, संजय शिरसाट यांनी आम्ही इथे कोणतेही राजकारण करण्यासाठी किंवा निवडणुका लढवण्यासाठी आलेलो नाही तर भारतमातेच्या या वीर पुत्राच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.











