- सचिन, कांबळीही त्याला देव मानायचे…
- वयाच्या 61 व्या वर्षी एकांतात निधन
मुंबई : ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर आणि धडाकेबाज विनोद कांबळी ज्याला देव मानायचे त्या मुंबईकर स्थानिक क्रिकेटपटू सचिन गुरवचा अंत मात्र शोचनीयच झाला. एकेकाळी मुंबईचा ‘व्हिव्हियन रिचर्ड’ म्हणून जो ओळखला जायचा त्या सचिनचे नुकतेच अतिशय वाईट अवस्थेत वयाच्या ६१व्या वर्षी नालासोपारा येथे निधन झाले. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांचा हा आवडता खेळाडू नशिबाच्या फेऱ्यात सापडला आणि नियतीने त्याच्यातील कौशल्याला वावच मिळू दिला नाही. लालबागच्या गणेश गल्लीत राहणारा अनिल त्याच्या गँगस्टर भावामुळे पोलिसी अत्याचाराचा बळी ठरला आणि एका गुणवान क्रिकेटपटू करिअर उमलण्याआधीच दुर्दैवाच्या दशावतारात सापडला आणि अखेर अनंतात विलीन झाला.
अनिल गुरव यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले. ते अत्यंत प्रतिभावान खेळाडू होते, ज्यांना रमाकांत आचरेकर सरही सचिन-विनोदला आदर्श म्हणून दाखवायचे. दुर्दैवाने, गँगस्टर भावामुळे त्यांना क्रिकेट सोडावे लागले आणि त्यांचे चमकणारे करियर अकाली संपुष्टात आले, एकांतवासात त्यांचा दुःखद अंत झाला.
31 मार्च 2026 रोजी अनिल गुरव यांनी वयाच्या 61 व्या वर्षी नालासोपाऱ्यात अतिशय गरिबीत जगाचा निरोप घेतला. अत्यंत प्रतिभावंत खेळाडू, महान खेळाडूंचे सर्व कसब अंगी असलेला ‘शापित’ खेळाडू म्हणून अनिल यांच्याकडे पाहिले जाते. शिवाजी पार्कचं मैदान गाजवणारा हा अवलिया. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीही त्यांना देव मानायचे. एकदा विनोद कांबळी म्हणाला होता, आचरेकर सरांनी कधीच सचिन आणि माझ्या कोणत्याच खेळीचं कधी कौतुक केलं नाही. पण हेच रमाकांत आचरेकर अनिलची बॅटिंग बघण्यासाठी स्वत: सचिन आणि विनोदला घेऊन जायचे. अनिल कसा खेळतोय याचं निरीक्षण करायला सांगायचे. यावरून अनिल गुरव किती प्रतिभावंत असतील याची कल्पना यावी.
‘द्रोणाचार्य’ पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या शिष्यांपैकी अनिल गुरव हे एक होते. आचरेकर सरांचा सर्वात उत्कृष्ट आणि जवळचा शिष्य म्हणजे अनिल. पण नशिबाने त्यांना कधी साथ दिली नाही. अनिल क्लबस्तरावरील क्रिकेटच्या पलिकडे जाऊ शकले नाही. मुंबई टीम आणि भारतीय संघात खेळू शकले नाही. आयुष्यात काही घटना घडल्या आणि त्यांना क्रिकेटपासून दूर जावं लागलं. इतकं की अनिल एकांतवासात राहू लागले. या एकांतवासातच मंगळवारी नालासोपऱ्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आचरेकरांचा सर्वात लाडका शिष्य
तुफान खेळी करण्यासाठी अनिल गुरव प्रसिद्ध होते. म्हणूनच त्यांना मुंबईचा व्हिव्हियन रिचर्ड्स म्हटलं जायचं. अनिल गुरव हे सचिन आणि विनोदपेक्षा सीनिअर होते. सचिन तेंडुलकरपेक्षाही अनिल चांगलं खेळायचे. सचिन आणि विनोदने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा आचरेकर सर या दोघांनाही अनिल यांची फलंदाजी पाहण्यासाठी मैदानावर घेऊन जायचे. प्रचंड प्रतिभा असूनही मुंबई किंवा भारतीय संघासाठी अनिल गुरव खेळू शकले नाही. अंडर 16 आणि अंडर 19 पर्यंतच्या संघातच ते खेळले. त्यांनी आचरेकर सरांच्या ‘ससानियन क्रिकेट क्लब’ आणि ‘कामत मेमोरियल’चंही प्रतिनिधीत्व केलं. शालेय जीवनात अनिल गुरव यांनी सचिन तेंडुलकरला आपली बॅट दिली होती. सचिनची हीच बॅट मैदानात तळपली होती. त्याने याच बॅटमधून धावांचा पाऊस पाडत पहिलंवहिलं शतक झळकावलं होतं, असं सांगितलं जातं.
भावामुळे बरबाद…
अनिलचा भाऊ अजित हा गुन्हेगारी जगतात होता. त्यामुळे सतत पोलीस येऊन त्रास द्यायचे. अनिल त्याच्या भावासारखाच दिसायचा. त्यामुळे एकदा पोलिसांनी अजित समजून अनिललाच उचललं आणि त्याला बेदम मारलं. त्यामुळे अनिल इतका कोलमडला की तो पुन्हा उभा राहिलाच नाही. तो नंतर मैदानावर दिसलाच नाही. त्यामुळे एका प्रतिभावंत खेळाडूची अखेर झाली
‘आचरेकर सर सचिन आणि इतर खेळाडूंना नेटमध्ये अनिल गुरवची फलंदाजी पाहायला सांगायचे. ज्यांच्याकडून खूप काही शिकल्या जाऊ शकत होतं, असे अनिल गुरव होते. आचरेकर सरांच्या सर्वात आवडत्या शिष्यांपैकी ते एक होते. त्यांचे मित्र त्यांना ‘मुंबईचा व्हिव्हियन रिचर्ड्स’ म्हणायचे. त्यांचा स्केअर कट व्हिव्हियनसारखा होता म्हणून नव्हे तर लेग साईडलाही अनिल गुरव तितकीच शानदार फलंदाजी करायचे म्हणूनच त्यांना व्हिव्हियन रिचर्ड्स म्हटलं जायचं. ‘
– नदीम मेमन ,एमसीएचे पीच क्युरेटर








